शेतकरी बंधूंनो, संत्रा व मोसंबी बागांमध्ये फळे पक्व होण्याचे अवस्थेत फळमाशीचा मोठा प्रादुर्भाव
होतो. व फळपिकाचे मोठे नुकसान होते. या माशीला रोखण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर किटकनाशकाची
फवारणी करतात. फवारणीमुळे विषबाधा होण्याची शक्यता असते. शिवाय खर्चही वाढतो. त्यामुळे
फळबागेतच कमी खर्चात आपण स्वत:च फळमाशी नियंत्रणाचे सापळे तयार करू शकतो. या सापळ्यांचा
उपयोग करून अत्यंत प्रभावी नियंत्रण आणि कमी खर्चात कशा प्रकारे करता येईल ते बघू या. ही सापळे आंबा
बागेतही तेव्हढेच प्रभावी आहेत.
आवश्यक साहित्य
1. अॅल्युमिनियम फॉईल
1. पारदर्शक प्लास्टिक (मिनरल वॉटर) बॉटल
2. मिथील युजीनॉल (फळ माशी आकर्षण गंध) - चार भाग
3. इथील अथवा मिथिल अल्कोहोल - सहा भाग
4. कीटकनाशक (मॅलाथीऑन) - एक ते दोन भाग
5. अर्धा इंच जाडीचा सुती दोर
6. हात मोजे
7. बारीक तार
सापळा तयार करण्याची पद्धत
1. एक लिटर पाण्याची प्लास्टिक बॉटल घ्यावी. चाकूच्या साह्याने वरून तीन इंच अंतरावर एक इंच
आकाराच्या तीन खिडक्या तयार कराव्या.
2. बॉटलच्या झाकणावर दाभणाच्या साह्याने एक लहान छिद्र करावे, एक बारीक वायर घेऊन केलेल्या
छिद्रातून घालून वरील भागात बॉटल अटकविण्यासाठी एक लूप तयार करावा व झाकणाच्या खाली दुसऱ्या
बाजूला लुर बांधण्यासाठी हूक तयार करावा.
3. अर्धा इंच जाडीचा सुती दोर घेऊन त्याचे 2 इंच आकाराचे तुकडे करावे.
4. लूर तयार करण्यासाठी मिथील अथवा इथील अल्कोहोल 37.5 मिली, मिथील युजीनॉल 25 मिली व
कीटकनाशक (मॅलाथीऑन )12.5 मिली (६:४:२) या प्रमाणात घेऊन एक वेगळ्या काचेच्या भांड्यात मिसळून
द्रावण तयार करावे.
(द्रावण तयार करत असताना हात मोजे तथा मास्कचा वापर करावा)
5. तयार केलेल्या द्रावणात दोन इंच कापलेले दोराचे तुकडे 24 तासाकरिता बुडवून ठेवावे व बंद तोंडाच्या
काचेच्या पात्राला वरून ॲल्युमिनियम फॉईल ने झाकून ठेवावे.
6. 24 तासानंतर भांड्यातील एक लूर बॉटलच्या झाकणाच्या आतील बाजूला केलेल्या हुक वर बांधून घ्यावा
आणि बॉटल चे झाकण बंद करावे अशा प्रकारे फळमाशी व्यवस्थापनाकरिता सापळा वापरासाठी तयार होतो.
7. तयार सापळा फळ झाडावर 3 ते 4 फुट उंचीवर लटकवावा.
8. फळमाशीच्या योग्य व्यवस्थापनासाठी (4मिली/ लूर) 6 ते 10 सापळे/एकर या प्रमाणे वापरावे.
9. दर 30-40 दिवसांनी सापळ्यामधील लूर बदलावेत. 75 मिली तयार द्रावणातून साधारणतः 18 ते 19
लूर तयार होतात. उर्वरित सर्व लूर ॲल्युमिनियम फाईल मध्ये गुंडाळून बंद डब्यामध्ये थंड जागी साठवून
ठेवावेत.
10. सर्व प्रकारच्या फळझाडांसाठी फळे लागण्यापासून ते फळे काढणीपर्यंत या सापळ्यांचा वापर करू शकतो व
योग्य प्रकारे कमी खर्चात फळमाशीचे व्यवस्थापन करू शकतो.
लिंबूवर्गीय फळे, आंबा बागांतील फळगळ कमी करणेसाठी फळ माशी नियंत्रण कमी खर्चात करण्याची पद्धत जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
डॉ विद्या मानकर
प्राचार्य, रामेती, नागपूर