शेती हा अनेक अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जगाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने अन्नाची मागणीसुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. तथापि, वेगाने बदलणारे हवामान, मातीची सुपीकता कमी होणे, मॅक्रो आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता, रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा गैरवापर आणि जमिनीत जड धातूंची उपस्थिती यामुळे कृषी उद्योग संकटाला तोंड देत आहे. या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि उत्पादकता सुधारण्यासाठी, पीक उत्पादन तंत्रांमध्ये अनेक बदल सुरू करण्यात आले आहेत.
जगभरातील शेतकऱ्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. ज्यामुळे त्यांची प्रभावीपणे पिके घेण्याची आणि पशुधन वाढवण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. शेतकऱ्यांपूढील काही प्रमुख आव्हाने खालीलप्रमाणे आहेत,
- हवामानातील बदल: हवामानातील बदलांमुळे अप्रत्याशित वाढणारे हंगाम येऊ शकतात, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांची लागवड आणि कापणीचे वेळापत्रक आखणे कठीण होते.
- कीड आणि रोग: कीड आणि रोग पिके आणि पशुधन नष्ट करू शकतात, ज्यामुळे लक्षणीय नुकसान होते.
- बाजारपेठेत प्रवेश: बरेच शेतकरी, विशेषत: दुर्गम किंवा ग्रामीण भागातील, बाजारात प्रवेश मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो ज्यामूळे त्यांचे शेतमालाला योग्य दर मिळत नाही.
- क्रेडिटचा प्रवेश: शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात गुंतवणूक करण्यासाठी अनेकदा कर्जाची आवश्यकता असते, परंतु अनेकांना परवडणारे आर्थिक मदत/कर्ज वेळेवर मिळत नाही.
- तांत्रिक आव्हाने: तंत्रज्ञानामध्ये कृषी उत्पादकता मोठ्या प्रमाणात सुधारण्याची क्षमता असताना, अनेक शेतकऱ्यांकडे आधुनिक यंत्रसामग्री, उच्च दर्जाचे बियाणे आणि इतर तांत्रिक प्रगतीचा अभाव आहे. धोरणातील आव्हाने: शेतीशी संबंधित धोरणांचा शेतकऱ्यांवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. यामध्ये व्यापार, सबसिडी आणि नियमांशी संबंधित धोरणे समाविष्ट असू शकतात.
- शिक्षण आणि प्रशिक्षण: अनेक शेतकऱ्यांना नवीन तंत्रे किंवा तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी आवश्यक असलेले शिक्षण आणि प्रशिक्षण मिळू शकत नाही.
या आव्हानांवर मात करण्यासाठी पारंपारिक पीक उत्पादन तंत्रात अनेक बदल केले जाऊ शकतात. पारंपारिक पीक उत्पादन तंत्रात केलेले हे बदल शेतीतील उत्पादकता सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. ते केवळ अन्नाची वाढती मागणी पूर्ण करण्यात मदत करत नाहीत तर कृषी पद्धती शाश्वत आहेत आणि पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, याचीही खात्री करतात.
सोयाबीन या पिकाचा उगम चिन देशात झाला असुन ते संपूर्ण जगभर कमी/जास्त प्रमाणात घेतले जाते. मुख्यत: ब्राझील, अमेरीका, चिन व भारत असे अनेक देशात घेतले जाते. भारतात मध्यप्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तेलंगाना इत्यादी राज्यात घेतले जाते.
महाराष्ट्र राज्याचा विचार करता एकुण खरिप क्षेत्राच्या जवळपास 50 टक्के क्षेत्रावर घेतले जाते खरीपातील मुख्य पीक म्हणुन हया पिकाकडे बघीतले जाते ४८ लाख क्षेत्रावर या पिकाची पेरणी केली जाते. परंतू क्षेत्राच्या तुलनेत महाराष्ट्राची सरासरी उत्पादकता 1345 kg/he आहे. ती इतर देशाच्या तुलनेत फारच कमी आहे. दिवसेंदिवस देशाच्या निविष्ठा वरील वाढता खर्च बघता निव्वळ उत्पन्न फारच कमी किंवा कधी कधी लागवड खर्च ही शेतक-यांचा निघत नाही. तसेच सोयाबीनच्या अंतराष्ट्रीय बाजारातील दर हे DOC वर अवलंबुन असतात. सोयाबिनमध्ये १८ टक्के तेलाचे तर 41 टक्के प्रथिनाचे प्रमाण असल्यामूळे परदेशामध्ये डुकराचे खादय म्हणुन याचा वापर होते.
महाराष्ट्रामध्ये लातुर, नांदेड, वाशीम, बुलढाणा,अकोला, यवतमाळ व अमरावती हे मुख्य सोयाबीन उत्पादक जिल्हे आहेत. क्षेत्र, उत्पादन, उत्पादकतेचा विचार करता हेक्टरी उत्पादकता वाढविल्यास शेतक-यांच्या निव्वळ उत्पान्नात वाढ होईल या गोष्टीचा विचार करून सदयास्थितीत पांरपारीक पध्दतीने शेतकरी हे पिक घेतात या मध्ये तांत्रीक दृष्टया काय बदल करता येईल यामध्ये घरघूती पध्दतीने तयार केलेले बियाणे वापरून खर्च कमी करने, बियाणे प्रतवारी, उगवण क्षमता, बिजप्रक्रीया, योग्य वाणाची निवड, सोयाबीन करिता हलक्या जमिनीचा वापर न करणे, पेरणीच्या पध्दतीत बदल करून सरी वरंभ्यावर टोकन पध्दतीने लागवड करणे, रासायनिक खताचा संतुलित वापर, एकात्मिक किड व रोग नियमन पेरणीची खोली इत्यादी बाबीचा अवलंब केल्यास निश्चितच खर्च कमी करून उत्पादकता वाढविणे शक्य आहे.
या करीता विदयापिठाने शिफारस केलेल्या बाबी मुद्दे निहाय मांडुन अष्टसुत्री तयार करण्यात आली. गावोगावी प्रचार प्रसार करून सन 2020-21 पासुन याचा अवलंब करण्यात सुरूवात झाली त्यामध्ये सोयाबीनची उत्पादकता वाढ झाली सन 2021-22 मध्ये राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन व इतर गळीतधान्य उत्पादन वाढ व मुल्यसाखळी विकास कार्यक्रमा अंतर्गत 2000 हे व राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (NFSM) अंतर्गत 1200 हेक्टर असे एकुण 3200 हेक्टर क्षेत्र 3622 शेतक-यांचे क्षेत्रावर प्रयोग घेण्यात आले यामध्ये पारंपारीक पध्दती पेक्षा सरी वरंभ्यावर लागवड केल्यामुळे 29 टक्के उत्पादकतेत वाढ आढळुन आली. सरी वरंभ्यावर लागवड केल्यामुळे उत्पादकता वाढी बरोबरच मोठया प्रमाणावर जलसंधारण होते.
सोयाबीनच्या लागवड तंत्रज्ञानातील परिणामकारक बदलांपैकी एक म्हणजे "सोयाबीनची उत्पादकता वाढवण्यासाठी अष्टसुत्री पद्धतीचा चा वापर. सोयाबीन लागवडीची ही परिणाम आधारित पद्धत श्री शंकर मारुतीराव तोटावार, तत्का. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम यांनी निर्धारित केली आहे.
असे आढळून आले आहे की, बहुतांश शेतकऱ्यांना अलीकडील उच्च उत्पादन देणार्या जाती, अलीकडील तांत्रिक बदल आणि सोयाबीनच्या लागवड पद्धतींबद्दल माहिती नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनचे अपेक्षित उत्पादन व उत्पादकता मिळत नाही. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना सोयाबीनवरील विविध रोग व कीड आणि त्यांच्या व्यवस्थापन पद्धतींबाबत माहिती नसते.
सोयाबीनची उत्पादकता वाढवण्यासाठी अष्टसुत्री पद्धतीची महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यातील 75% पेक्षा जास्त खरीप क्षेत्रावर सोयाबीनचे पीक घेतले जाते. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या निव्वळ उत्पन्नावर विलक्षण परिणाम होतो. शेतकर्यांचे निव्वळ उत्पन्न वाढवायचे असेल तर सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढवणे, कीड व रोग व्यवस्थापन आणि लागवड पद्धती यावर लागवडीचा खर्च कमी करणे आवश्यक आहे. सोयाबीनच्या अलीकडच्या सर्वोत्तम आणि जास्त उत्पादन देणाऱ्या वाणांबद्दल शेतकऱ्यांमध्ये जागृती करून हे साध्य करता येईल.
वरील वस्तुस्थिती लक्षात घेऊन, महाराष्ट्र राज्य कृषी विभागातर्फे श्री शंकर मारुतीराव तोटावार, तत्का. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम यांनी सोयाबीन उत्पादकांसाठी मानक कार्यप्रणाली (SOP) तयार केली आहे, म्हणजे ASHTSUTRI (पीक उत्पादन तंत्रज्ञान) चा वापर ज्यात प्रामुख्याने खाली 8 बाबींवर लक्ष केंद्रित केले आहे.
1. बियाण्याची प्रतवारी
2. बियाणे घरगुती उगवण पद्धती
3. बीजप्रक्रिया - बीजप्रक्रिया केल्यानंतरच पेरणी करावी
4. वाणांची निवड - दहा वर्षांच्या आत प्रसिद्ध झालेल्या वाणांची निवड करावी
5. पेरणीची खोली
6. पेरणीच्या पद्धती
7. खताची मात्रा/एकर (12:30:12),
8. तणनाशकांचा वापर
मार्च 2020 ते मे 2020 या कालावधी, प्रत्येक गावात महिला बचत गट (SHGs) च्या मदतीने घरबसल्या बियाण्याची प्रतवारी, बियाणे उगवण क्षमता तपासणीची घरगुती पद्धत व बीजप्रक्रिया करणेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. ट्रॅक्टर चालकांना प्रशिक्षण देण्याची मोहीम घेण्यात आली. पेरणीपूर्वी बियाणे आणि खतांच्या डोसचे अंशांकन आणि पेरणी करताना ट्रॅक्टरचा वेग योग्य ठेवण्याबाबत चालकांना मार्गदर्शन करण्यात आले. सन 2020-21 आणि 2021-22 मध्ये विभागाने 43955 शेतकर्यांच्या सहभागासह बियाणे प्रतवारी आणि उगवण चाचणीसाठी 2097 प्रात्यक्षिके आणि 5454 ट्रॅक्टर चालक आणि 3139 मालकांसाठी बियाणे आणि खतांच्या डोस आणि पेरणीच्या पद्धतीबाबत 946 प्रशिक्षण वर्ग आयोजित केले होते. सन 2020-21 पासून आत्तापर्यंत सोयाबीन पिकाच्या सुधारीत पद्धत अष्टसुत्रीचा अवलंब केल्यामूळे सोयाबीनच्या उत्पादकतेत लक्षनीय वाढ झाली. सर्व संबंधित शेतकऱ्यांनी सांगितलेल्या सर्व SOP चे तंतोतंत पालन केल्यामूळे गेल्या पाच वर्षात सोयाबीन पिकाची सरासरी उत्पादकता 9.25 क्विंटल/हेक्टर ने वाढली. म्हणजेच, सन 2020-21 मध्ये 17.61 क्विंटल/हे. आणि सन 2021-22 मध्ये 16.41 क्विंट/हे. सोयाबीनचे उत्पादन झाले.
एकंदरीत, सन 2020-21 मध्ये ASHTSUTRI (पीक उत्पादन तंत्रज्ञान) च्या वापरामुळे, वाशिम जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी मागील वर्षांच्या तुलनेत सोयाबीनचे 47.47% अधिक उत्पन्न मिळवू शकले, ज्यामुळे निव्वळ उत्पन्नात वाढ झाली व त्याचा शेतकऱ्यांच्या जीवनमानावर सकारात्मक परिणाम झालेला आहे.
1. घरगुती सोयाबीनची प्रतवारी करणे
अ) स्पायरल सेपरेटवर
बहुतेक शेतकरी सोयाबीनचे घरचे बियाणे पेरणी करीता वापरत असतांना प्रतवारी न करता वापरतात, त्यामुळे पेरणीसाठी सरसकट ३५ ते ४० किलो बियाणे वापरतात. सोयाबीन पिक स्वयंपरागसिंचीत असल्याने या पिकाचे सुधारीत वाणाचा वापर केला जातो. सर्वसाधारणपणे ६५ टक्के बियाणे दरवर्षी घरगुती निवडपध्दतीने राखुन ठेवुन ती पेरणी केली जाते. घरगुती राखुन ठेवलेले बियाणे वापर करतांना स्पायरल सेपरेटरमधुन प्रतवारी करुन घ्यावी.
प्रतवारी केलेल्या बियाण्याची घरगुती पध्दतीने उगवणक्षमता तपासावी. उगवणक्षमता ७० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास शिफारशीनुसार हेक्टरी ६५ ते ७५ किलो बियाणे वापरावे, ७० टक्के पेक्षा कमी उगवणक्षमता असल्यास प्रति १ टक्का उगवणीकरीता अर्धा किलो प्रमाणे बियाण्याची मात्रा वाढवावी. प्रतवारी करुनही उगवणक्षमता ६० टक्के पेक्षा कमी असल्यास असे सोयाबीन बियाणे म्हणुन पेरणी करीता वापर करु नये.
स्पायरल सेपरेटर
ब) बियाणे प्रक्रिया केंद्रावरुन प्रतवारी करुन घेणे
ज्या शेतकऱ्यांकडे घरगुती पध्दतीने राखुन ठेवलेल्या सोयाबीनची उपलब्धता मोठया प्रमाणावर आहे अशा शेतक-यांनी जिल्हयातील बियाणे उत्पादन करणा-या शेतकरी उत्पादक कंपन्या व बिजोत्पादन करणा-या खाजगी कंपन्याच्या बिजप्रक्रिया केंद्रावर घरगुती बियाण्याची प्रतवारी करुन घ्यावी. सध्या बियाणे उत्पादन करणा-या कंपन्याशी संपर्क करुन बियाण्याची प्रतवारी करुन घ्यावी.
२) घरगुती पध्दतीने बियाणे उगवणक्षमता तपासणी करण्याच्या पध्दती
१) सर्व बियाण्याचे प्रतिनिधीत्व करतील असे १०० दाणे ओल्या गोणपाटावर रुजविण्यास ठेवावे.
२) सर्व बियाण्याचे प्रतिनिधीत्व करतील असे १०० दाणे ओल्या टिश्यु पेपरवर रुजविण्यास ठेवावे
३) सर्व बियाण्याचे प्रतिनिधीत्व करतील असे १०० दाणे ओल्या न्युज पेपरवर रुजविण्यास ठेवावे
४) सर्व बियाण्याचे प्रतिनिधीत्व करतील असे १०० दाणे ओल्या जर्मेनेटींग पेपरवर रुजविण्यास ठेवावे.
५) सर्व बियाण्याचे प्रतिनिधीत्व करतील असे १०० दाणे सावली खाली मातीच्या ट्रेमध्ये ३ ते ५ से.मी. खोलीवर रुजविण्यास ठेवावे
६) सर्व बियाण्याचे प्रतिनिधीत्व करतील असे १०० दाणे सावली खाली ओल्या मातीमध्ये ३ ते ५ से.मी. खोलीवर रुजविण्यास ठेवावे
३) बिजप्रक्रिया
बिजप्रकिया करुन पेरणी केल्यामुळे रोपांची उगवण चांगली होते, रोपाची जोमदार वाढ होते व सुरुवातीच्या काळात किड व रोगापासुन पिकाचे संरक्षण होते तसेच जैविक बिजप्रक्रिया केल्यामुळे द्विदल पिकाचे मुळावरील गाठीमुळे हवेतील नत्र स्थीरीकरण होते तसेच स्फुरद पिकास मुळाद्वारे घेण्याच्या स्थितीत उपलब्ध करुन देते.
रासायनिक बिजप्रक्रिया
पेरणीपुर्वी दोन महीण्या अगोदर किंवा एक दिवस पेरणी पुर्वी कार्बोक्झीन ३७.५ टक्के ३ ग्रॅम + थायरम ३ ग्रॅम/ प्रति किलो बियाण्यास लावावे. खोडमाशीकरीता थायोमेथोक्झाम ३० टक्के एफ. एस. १० मी.ली./किलो. रस शोषणा-या किडीसाठी इमीडाक्लोप्रीड १.५ मी.ली./किलो बियाणे लावावे.
जैविक बिजप्रक्रिया
२५ ग्रॅम किंवा ६ मी.ली. रायझोबीयम + २५ ग्रॅम किंवा ६ मी.ली. पी.एस.बी. व ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम किंवा ६ मी.ली. पेरणीपुर्वी दोन तास अगोदर करुन बियाणे सावलीत सुकवुन पेरणी करावी.
४) वाणाची निवड
शक्यतो दहा वर्षाच्या आतील वाणाची निवड करावी. ( जेएस-२०२९ (२०१४), एमएयुएस- १५८ (२०१०), एएमएस -१००१(२०१८), एएमएस - एमबी -५-१८ (२०१९), एमएयुएस - १६२ (२०१४), जेएस - २०३४ (२०१४), जेएस - २०९८ (२०१९), एमएसीएस -११८८ (२०१३), एनआरसी -८६ (२०१५), एमएयुएस - ६१२ (२०१६) फुले अग्रणी (केडीएस -३४४) (२०१३), फुले संगम (केडीएस- ७२६) (२०१६), फुले किमया(केडीएस- ७५३) (२०१७), एएमएस -१००- ३९ (२०१९), केडीएस- ९९२ (२०२०).
५) पेरणीच्या पध्दती
सलग दोन ते तिन दिवसात ७५ ते १०० मि.मी. पाऊस अथवा चार ते सहा इंच जमीनीत ओल उपलब्ध झाल्यानंतर व वापसा आल्या नंतरच पेरणी करावी.
शंकर मा. तोटावार
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, चंद्रपूर