Translate to :  

वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) नागपूर

वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) नागपूर

कापसाची गुलाबी बोंड अळी रक्षणासाठी नविन तंत्रज्ञान

                            

चारुदत्त मायी, भगीरथ चौधरी, संदीप आगळे, राहुल पंचभाई आणि कमलेश ठलाल

अॅग्राव्हीजन फाऊंडेशन, नागपूर आणि साऊथ एशीया बायोटेकनॉलॉजी सेंटर, जोधपूर

महाराष्ट्रात कापसाची लागवड साधारण 42 लक्ष हेक्टरवर केल्या जाते. त्यामधील 96 टक्के कापूस उत्पादन हे 20 जिल्ह्यांमध्येच होते. गेल्या 3 वर्षापासून बिटी कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसत आहे आणि त्यामुळे कापूस उत्पादक काही प्रमाणात अडचणीत आले आहे. ह्या किडीचा प्रादूर्भाव वाढण्याची कारणे देखील स्पष्ट झाली आहेत. त्यामध्ये कापूस फरतड होईपर्यंत ठेवणे, जिनींगच्या जागी कच्चा कापूस साठवून ठेवणे, एकच एक पीक दरवर्षी घेणे आणि जास्त कालावधीच्या कापसाची लागवड पूर्व हंगामात सूरू करणे ह्यांचा समावेश आहे. बिटी कापसाच्या बियाण्याच्या थैलीत (Bag) गैर बीटी (रेफ्यूजीया) बियाणे मुख्य पिकाच्या भोवती लावण्यासाठी दिले जात असे. परंतु शेतकरी सहसा त्यांचा वापर करत नसत. म्हणून गेल्या वर्षीपासून रेफ्यूज बियाणे 5 टक्के ह्या प्रमाणात मुख्य बीटी बियाणाच्या बॅगमध्येच समीश्र करून आता शेतकऱ्यांना दिले जाते. जेणेकरून रेफ्यूज हे शेतामध्ये लावल्या जाईल आणि बिटी कापसाची प्रतिकार शक्ती कायम राहील.

अॅग्रोव्हीजन फाऊंडेशन आणि एसएबीसी गेल्या तिन वर्षापासून गुलाबी बोंडअळी नियंत्रण अभियान सातत्याने विदर्भात राबवत आहे. ह्याला शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसादही दिला आहे. तसेच ह्यामुळे ह्या किड-नियंत्रणाची सूत्रे शेतकऱ्यांना अवगत झाली आहेत. ह्या अभियानामध्ये शेतकऱ्यांना बोंडअळीच्या निरनिराळ्या अवस्थांची ओळख करून देणे, शेतामध्ये नुकसानीचे स्वरूप काय असेल याची माहिती देणे तसेच सर्वेक्षण आधारीत आर्थिक नुकसानीची पातळी कशी ठरवायची ह्यांचे संपूर्ण ज्ञान दिले गेले.


नुकसानीचे स्वरूप आणि आर्थिक नुकसानीची पातळी

गुलाबी बोंड अळीचे पतंग कोवळ्या पात्या, कळ्या व बोंडावर अंडी घालण्यास अधिक पसंती देतात. अंड्यातून निघालेली अळी बोंडात शिरल्यानंतर तिच्या विष्ठेने व बोंडाच्या बारीक कणाच्या सहाय्याने छिद्र बंद करते. ज्यामुळे बोंडाचे वरून निरीक्षण केल्यानंतर सुद्धा अळीचा प्रादुर्भाव ओळखता येत नाही. या अळीचा प्रादुर्भाव बोंडामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. किडलेल्या पात्या गळून पडतात किंवा अशी बोंडे परिपक्व न होताच फुटतात. गुलाबी बोंडअळी सरकीचेही नुकसान करते. सरकी किडलेली असल्यामुळे बियाण्याची उगवणशक्ती कमी होते तसेच धाग्याची लांबी व मजबूतीही कमी होते. तसेच ही कीड बोंडामध्ये लपून राहत असल्यामुळे वरून सहजासहजी प्रादुर्भाव झालेला दिसून येत नाही. त्यामुळे हंगाम जसजसा लांबला जाईल तसतसे बोंडावरील प्रादुर्भावाचे प्रमाणे वाढत जाते.

गुलाबी बोंड अळी नियंत्रणाचे प्रमुख उपाय


सध्या कापसाचे पीक पात्या व फूले लावण्याच्या अवस्थेत (45 ते 60 दिवस) आहे. मागील काही दिवसापासून गुलाबी बोंड अळीच्या प्रादूर्भावाच्या वार्ता वर्तमानपत्रात येत आहे. कापूस संशोधन केंद्राच्या सर्वेक्षणानुसार अजूनही 2-4 टक्केच्या वर प्रादूर्भाव नाही आणि ज्या काही डोमकळ्या आढळतात त्या प्रामुख्याने गैरबिटी झाडावर दिसत असतील. कारण ह्या वर्षी 'रेफ्यूजीया इन बॅग' असल्यामुळे शेतामध्ये 5 टक्के झाडे ही गैरबिटीची असतील. हे तंत्रज्ञान मुद्दाम ह्यासाठी केले आहे की, ज्यामुळे बीटी कापसाची प्रतिकारक्षमता पुन्हा वाढेल. शेतकऱ्यांनी अळ्या दिसतातच घाबरून जाऊ नये. वाढता प्रादुर्भाव रोखून पुढील नुकसान टाळण्यासाठी खाली दिलेल्या एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा वेळेत अवलंब करणे आवश्यक आहे.


• पीक पात्याअवस्थेत असतांना 5 टक्के निंबोळी अर्क 50 मिली अधीक नीम तेल 5 मिली, 1 ग्रॅम डिटरजंट पावडर असे प्रति लिटर पाण्यातून फवारावे. सोबतच जैव किड नियंत्रणाचे सर्व सूत्र देखील पाळावे. उदाहरणार्थ, सापळा पिके, मका, झेंडू, भेंडी, पक्षी थांबे ह्याचा देखील फायदा होतो. गरजेनुसार ट्रायकोकार्डस्चा वापर करावा.

• पतंगाच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एकरी दोन याप्रमाणे पेक्टीनो-ल्यूअर अथवा गॉसिल्यूर हे सक्रीय घटक असलेले कामबंध सापळे लावावेत. त्यांत अडकलेल्या पतंगांची आर्थिक नुकसानाची पातळी (8 पतंग प्रति सापळा 1 रात्रीतून सलग 3 रात्री) ओलांडण्यास त्वरीत फवारणी करावी. आर्थिक पातळी जर पहिल्या 60 दिवसापर्यंत ओलांडली असेल तर वर सांगितल्याप्रमाणे निंबोळी अर्काची फवारणी करावी. ह्या काळात म्हणजे 60 दिवसापर्यंत कोणतेही किटकनाशक वापरू नये. पिकाच्या 60 ते 90 दिवसांमध्ये जर आर्थिक पातळी ओलांडली असेल तर मात्र क्वीनॉलफॉस (25 टक्के ए.एफ.) 20 मिली किंवा थायोडोकार्ब (75 डब्ल्यूपी) 20 ग्रॅम किंवा क्लोरपायरीफॉस (20 ईसी) 25 मिली किंवा प्रोफेनोफॉस (50 ईसी) 30 मिली ह्या औषधांची फवारणी 10 लिटर पाण्यातून करावी.

• गरज भासल्यास 120 दिवसानंतर एकच फवारणी फेनव्हेलरेट (20 ईसी) 10 मिली किंवा सायपरमेथ्रीन (10 ईसी) 10 मिली किंवा लॅमडा साह्यालोथीन (5 ईसी) 10 मिली, 10 लिटर पाण्यातून फवारावे).

• किटकनाशके फवारतांना विशेष काळजी घ्यावी. कोणतेही दोन किटकनाशके मिश्रण करून फवारू नये. फवारतांना मास्क, प्रोटेक्टीव हुडचा वापर करणे गरजेचे आहे.


गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी एक नाविन्यपूर्ण प्रयोग

यंदाच्या खरीप हंगामामध्ये गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी एक भव्य परंतु नाविन्यपूर्ण प्रयोग घेतला जात आहे. दरवर्षीप्रमाणे विदर्भाच्या शेतकऱ्यांना यंदाही एका अभियानाद्वारे बोंडअळी नियंत्रणाचे तंत्रज्ञान प्रसारीत करत आहोतच. परंतु सोबत ह्या नविन तंत्रज्ञानाची माहिती देत आहोत.

दक्षिण आशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटर (एसएबीसी), जोधपूरच्या वतीने आणि अॅग्रोव्हिजन फाउंडेशन, नागपूरच्या सहकार्याने गुलाबी बोंडअळीपासून कपाशीचा बचाव करण्यासाठी देशातील सर्वात मोठा क्षेत्रीय प्रयोग नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातल्या वरोडा व आदासा आणि काटोल तालुक्यातील मेटपांजरा येथे करण्यात आला आहे. परिसरातील 360 एकरात लावलेल्या शेतातील कपाशीवर नविन्यपूर्ण 'किट संभोग विघटन' तंत्राचा वापर करून कपाशीच्या झाडांचे बोंडअळीपासून संरक्षण व्हावे, यासाठी रक्षाबंधन करण्यात आले आहे. 'पीबीनॉट' हे तंत्रज्ञान गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी खूप उपयोग ठरणार आहे आणि हे तंत्रज्ञान यशस्वी झाल्यानंतर शेतकऱ्यांपर्यंत पोहचविले जाईल जेणेकरून गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आपल्याला रोखता येईल. हे तंत्रज्ञान प्रोजेक्ट बंधनाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. ह्या साठी हया गावातील 200 शेतकरी एकत्र आले आहेत.

पीबी नॉट हे एक नविन्यपूर्ण 'किट संभोग विघटन' तंत्रज्ञान आहे जे अॅल्युमिनियम तार युक्त पॉलीथिलीन ट्युब आहे ज्यामध्ये गोसीप्लुअर कामबंध सक्रिय घटकाच्या रूपामध्ये आहे त्यालाच पीबी नॉट असे म्हणतात. पीबी नॉट कापसामध्ये गुलाबी बोंड अळीच्या संक्रमण व्यवस्थापनासाठी अतिशय परिणामकारक आहे. ज्याला नुकतेच भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या सीआयबी आरसीने मान्यता दिली आहे. या तंत्रज्ञानाला कृषीविद्यापीठामध्ये झालेल्या प्रात्यक्षिकाच्या आधारावर मान्यता देण्यात आली आहे. कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करण्यात हे तंत्र परिणामकारक सिद्ध झाले आहे. शिवाय, हे तंत्र वापरायला सोपे आणि मित्रकीटकांची सुरक्षा करणारे आणि पर्यावरणपूरक आहे. पीबी नॉटच्या जाळीला असलेला फेरोमेन सुंगध असापासच्या वातावरणात पसरेल आणि तो सुगंध बोंडअळीच्या नराला उत्तेजित करेल. मादीच्या शोधात आलेला नराची त्यामुळे दिशाभूल होईल आणि संभोग करण्यापासून पीबी नॉट त्याला प्रतिबंध करेल. त्यामुळे अंडी घालण्याची प्रक्रिया मंदावेल आणि गुलाबी बोंडअळीची भविष्यात संख्या नियंत्रणात येईल. हा दोरा कापसाच्या रोपाला कमीतकमी 60 ते 64 एकर क्षेत्रात सहजरित्या बांधता येतो. झाडाला फुले येण्याच्या व बोंड तयार होईपर्यंतच्या महत्त्वपूर्ण अशा 90 दिवसांच्या काळात पीबी नॉट कापूस झाडांचे संरक्षण करू शकते. त्यामुळे बोंडांचे नुकसान होत नाही, कापसाची गुणवता सुधारते आणि उत्पादन वाढते. हे तंत्रज्ञान गाव पातळीवर जास्त उपयुक्त आहे. गेल्या काही वर्षात गुलाबी बोंडअळीचा झालेला उद्रेक हा संशोधकांसाठी आव्हान ठरला होता. आता त्यावर पीबी नॉट तंत्रज्ञानामुळे उत्तम समाधान मिळाले असून विदर्भातील कापूस उत्पादकांना ह्या पुढे गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करण्यासाठी त्याची खूप मदत होईल.

ह्या प्रयोगाला शेतक-यांनी जास्तीत जास्त संख्येने भेट देऊन तंत्रज्ञान आत्मसात करावे ही अपेक्षा.


काढणी पश्चात करावयाच्या उपाययोजना

तंत्रज्ञानाचा वापर नेहमी एकात्मिक पद्धतीने करणे योग्य आहे, म्हणून पुढच्या वर्षी ह्या किडीचा उद्रेक होऊ नये म्हणून काढणी पश्चात काही उपाय योजना करणे आवश्यक आहे.

1. महाराष्ट्रात जानेवारी अखेरपर्यंत कपाशीची काढणी करून पिक पूर्णतः थांबवावे, ही शिफारस आहे. पिकाची काढणी झाल्यानंतर उरलेले अवशेष नष्ट करावे किंवा इंधनासाठीचे ठोकळे (विटा किंवा पॅलेट्स) बनावावेत.

2. पिकाचा हंगाम संपल्यावर खोल नांगरणी करावी. त्यामुळे पतंगाचे कोष उन्हाने किंवा पक्षाचे भक्ष झाल्यामुळे नष्ट होतील.

3. कुठल्याही परिस्थितीत कपाशीची फरदड घेऊ नये. वेळेवर कपाशीची वेचणी करून जानेवारी शेतामध्ये कपाशीचे पिक ठेवू नये.

4. हंगाम संपल्यानंतर शेतामध्ये जनावरे किंवा शेळ्या, मेंढ्या चरण्यासाठी सोडाव्यात.

5. हंगाम संपल्यावर ताबडतोब पहाटीचा बंदोबस्त करावा. शेतात किंवा शेताजवळ पहाटी साठवून ठेऊ नयेत.

6. जिनींग मिल व साठविलेल्या ठिकाणी कामगंध सापळ्याचा वापर करावा. कापूस साठवणूकीची गोदामे, सूतगिरण्या, बाजार समित्यांमध्ये प्रकाश सापळे व कामगंध सापळे वारावेत. यामुळे पिक काढणीनंतरचे पतंग पकडता येतील.

7. पूर्वहंगामी कापसाची लागवड करण्यापेक्षा उन्हाळी हंगामात येणारी पर्यायी पिके घ्यावीत. यामुळे पिकांचा फेरबदल होऊन किडीचा जीवनक्रम खंडीत होऊ शकेल. पिकाच्या फेरबदलामुळे जमिनीची सुपीकताही टिकवून ठेवता येईल.

card-grid-image
Dr. C. D. Mayee

Ex-Chairman, Agriculture Scientist Recruitment Board, GoI