Translate to :  

वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) नागपूर

वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) नागपूर

मातीचे व्यवस्थापन

                            'कवडीमोल' किंवा 'मातीमोल' असा उल्लेख आपण बोलतांना सहज करतो. ज्या वस्तुला किंमत नाही ती 'मातीमोल' असा शब्द प्रचलित आहे. परंतु जमिनीची उत्पादकता किंवा मातीची सुपिकता घटत आहे. त्यातून आता अन्नद्रव्यांची कमतरता, मातीतील कर्बचे घटणारे प्रमाण, याची लहरी हवामानाशी जोड होऊन समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे मातीचे मोल आता अनमोल झाले आहे. एकूणच माती, पर्जन्य (पाणी) आणि पिक यांचा समतोल साधणे हे अत्यंत महत्वाचे झाले आहे. विदर्भातील काळी माती चांगल्या जलधारण क्षमतेची आहे पण चिकण मातीचे प्रमाण अधिक असल्यामुळे वापसा/वापश्याची स्थिती फार काळ टिकत नाही आणि मशागतीची वेळ टळली तर पिकवाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. त्यासाठी काही साधे उपाय खालील प्रमाणे आहेत.                        
उपाय १
                            (१) खोल काळी जमिन असल्यास रुंद वरंबा सरी म्हणजेच Broad Bed Furrow (BBF) यंत्राचा पेरणीसाठी वापर करावा. ते शक्य नसल्यास पेरणी करतेवेळी दर तिसऱ्या किंवा चौथ्या ओळीनंतर साधारणतः १ मीटर (3 फूट) अंतर सोडावे. अधिक पाऊस झाला तर या मोकळ्या भागात डवऱ्याने पाणी वाहून नेण्यासाठी तात्पुरती चारी बनवता येते. माती-हवा-पाणी असे संतुलन त्यामुळे टिकवता येईल.                        
उपाय २
                            (२) पूर्व विदर्भात काळ्या मातीचे प्रमाण कमी आहे पण पाऊस अधिक पडतो. धानाऐवजी आता कापूस पिक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. तिथेसुद्धा अधिक पाणी वाहून नेण्यासाठी तात्पुरती चारी बनवणे लाभदायक ठरेल.                        
उपाय ३
                            (३) धानाचे पिक घेतल्यास शेतकरी ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत रोवणी करतात. पाण्याची सोय नसल्याने शेतकरी जुलैपर्यंत किंवा चांगला पाऊल होईपर्यंत बीजाई करत नाही त्यामुळे साहजिकच रोवणीला उशिर होतो यासाठी सामूहिक नर्सरी हा प्रभावी उपाय करता येईल. ८-१० शेतकऱ्यांनी पाण्याची सोय असलेल्या ठिकाणी एकत्रित बीजाई (नर्सरी) केल्यास वेळेवर रोवणी आणि धानाचे पिक लवकर काढणीयोग्य होते. त्याचा फायदा रबीची पेरणी लवकर करण्यासाठी होतो. धान कापणीच्या १५-२० दिवस आधी रबी पिकाची पेरणी (उतेरा पेरणी) केल्यास जमिनिचा ओलावा पूर्णपणे वापरता येतो.                        
उपाय ४
                            (४) जमिनीचे आरोग्य टिकवण्यासाठी पाण्याची (irrigation) सोय असल्यास सिंचनाचे प्रमाण मोजकेच ठेवावे. जास्त पाणी दिल्यास पिकाचे व जमिनिचे नुकसान होते. अत्याधिक सिंचन घातक ठरून जमिन क्षारयुक्त होते म्हणून १५-२० दिवसातून एकदा खूप पाणी देण्यापेक्षा बागायतदाराने दर आठवड्यात एकदा थोडे पाणी देणे अधिक चांगले, त्यातून विजेचीपण बचत होते. चिकणमाती (Clay) चे प्रमाण जास्त असल्यास ही काळजी आवश्यक आहे.                        
उपाय ५
                            (५) मातीचे आरोग्य टिकवण्यासाठी व त्यासाठी उपाययोजना करतांना आधी समस्या कोणत्या प्रकारची आहे हे शेतकऱ्याने समजून घ्यायला हवे. उदाहरणार्थ उतारावरची जमिन क्षरण झाल्यामुळे कमी उत्पादन देते. अश्यावेळी उतारालगत पेरणी न करता ती उताराविरुद्ध करावी, जमिनीवर पसरणारे मुळा, भुईमुगासारखे पिक घ्यावे. सेंद्रीय कर्बची कमतरता तर सर्वत्रच जाणवते. त्यासाठी कुजलेल्या खताचा (कंपोस्ट) वापर वाढवावा. त्यामुळे जलधारण क्षमता पण वाढते. अत्याधिक पाणी वापरल्यास जमिन क्षारयुक्त होते. काळ्या मातीत हा धोका अधिक असतो. केवळ सिंचनाची सोय आहे म्हणून मुक्त हाताने पाण्याचा वापर टाळावा. एकच पिक सातत्याने घेऊ नये, पिकबदल देखील आरोग्य टिकवण्यास मदत करतो. द्विदल पिक, उदाहरणार्थ हरभरा पेरल्यास नत्राचे प्रमाण सुधारते हे सर्वज्ञात आहे. गांडुळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे असे आपण म्हणतो पण गांडुळाची जोपासना शेतात किंवा कुजवण्यासाठी करत नाही. किटनाशकांचा वापर कमी करून जैविक उपाय जसे की ट्रायकोडर्मा कार्ड किंवा किटक सापळे वापरले तर मातीत नको असलेली रसायने शिरणार नाही आणि आरोग्यवर्धन होईल. काडी-कचरा आच्छादन म्हणून वापरला तर जमिनीतून होणारी पाण्याची वाफ कमी होते, शिवाय तणवाढ पण नियंत्रित होते. असे छोटे छोटे पण प्रभावी उपाय केल्यास जमिनीची उत्पादन क्षमता नक्कीच वाढते.                        
card-grid-image
डाॅ. नितीन जी. पाटील

संचालक, राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोग नियोजन, भा.कृ.अ.प., भारत सरकार